Saturday, March 1, 2025

महाकुंभ २०२५ : एक मैत्री पुर्ण अनुभव | भाग २

महाकुंभ २०२५ : एक मैत्री पुर्ण अनुभव  | भाग २  

हर हर गंगे! 🚩🙏

#Prayagraj #TriveniSangam #SpiritualJourney #SanatanDharma

कुंभमेळ्यामुळे प्रयागराज मध्ये झालेली विकास कामे आणि प्रचंड गर्दीमुळे लोकांची होणारी गैरसोय बघत आम्ही १२ तासांच्या प्रवासानंतर संरक्षण खात्याच्या सप्लाय डेपो  च्या गेट वर पोहोचलो. आमची मुक्कामाची सोय सैनिकांच्या बराकी मध्ये सरकारी पाहुणे म्हणून झाली होती. रीतसर ओळख परेड झाली, गेट उघडले आणि सरकारी इतमामात गेस्ट हाऊस मध्ये उतरलो. आपले पंतप्रधान दिवाळी सैनिकांबरोबर साजरी करतात त्याची आठवण आली आणि आपणही थोडे व्हीआयपी झाल्यासारखे वाटले, असो. कोणे एकेकाळी एन सी सी मध्ये ३ वर्षे काढली असल्यामुळे ईथली शिस्त आणि स्वच्छता याचा अनुभव गाठीशी होता म्हणून लगेच जुळवून घेता आले. 

ठाण्यापासून प्रयागराज पर्यंतचा सुखकर प्रवास आणि झालेल्या सोयीबद्दल देवाचे आणि मित्रांचे आभार मानत असतानाच अजून एक बातमी थडकली. एक पाहुणचाराचा  भाग म्हणून यजमानांनी आमचे अमृत स्नान हे सरस्वती घाटावरून बोटीने करून देण्याचे ठरविले होते. रिपोर्टींग दुसऱ्या दिवशी सकाळी साडेचार चे असल्यामुळे, आम्ही झटपट जेवण उरकून , सकाळची तयारी करून झोपी गेलो. 

सकाळी पाच वाजता आम्ही सरस्वती घाटावर पोहोचलो, गाडी जवळच पार्क केली आणि पन्नास एक पायऱ्या उतरून बोटीची वाट बघत राहिलो. घाट फारच सुंदर होता, जवळच्याच नैना पूलाला सुंदर विद्युत रोषणाई केलेली होती, समोरचा अरैल घाट भाविकांनी अगदी भरून वाहत होता. मग घाटावर तुझा फोटो, माझा फोटो, आपला फोटो,  पुलाचा फोटो असले चाळे करत वेळ काढला आणि तेव्हढ्यात दोन नावाडी एक एंजिनाची बोट घेऊन आले.  तिकीट अगोदरच काढली असल्यामुळे चौघांना जागा लगेच मिळाली आणि आणखी एक कुटुंबाबरोबर आमचा प्रवास त्रिवेणी संगमाच्या दिशेने सुरु झाला. अडीच किमी चा तो प्रवास पुढच्या तीस मिनिटात पूर्ण करू असे नावाडी म्हणायला आणि भोंग्यावरून 'मागे फिरा' असा जल पोलिसांचा आदेश यायला एकच गाठ पडली.   नावाड्याने आमची बोट जल पोलिसांच्या जवळ नेत माहिती काढली. आम्ही व्ही आय पी घाटावर जाणार होतो पण आमच्या अगोदर व्हीव्हीआयपिंचा चा नंबर असल्यामुळे आम्हाला नऊ वाजे पर्यंत प्रवेशबंदी होती.  तसा अजून अंधारच होता पण रंग उडालेले आमचे चेहरे मात्र स्पष्ट दिसत होते. नावाडी अनुभवी असल्यामुळे त्याने चिकाटीने पुढच्या एका तासात इकडे तिकडे फेऱ्या मारल्या आणि जल पोलिसांना विनंती  करून शेवटी एकदाचे त्रिवेणी संगमावर पोहचवले. 

सूर्योदयाच्या मुहूर्तावर आम्ही  गंगा, यमुना आणि अदृश्य सरस्वती यांच्या संगमस्थळी – त्रिवेणी संगमावर  उतरलो. उगवत्या सूर्याला नमस्कार केला आणि स्नानाची तयारी सुरु केली.  त्रिवेणी संगम येथे अमृतस्नान म्हणजे केवळ पाण्यात स्नान करणे नव्हे, तर आत्मशुद्धी, श्रद्धा आणि आध्यात्मिक उन्नतीचा एक सोहळा आहे. त्यामुळे महाकुंभाच्या पवित्र पर्वावर या स्नानाचा लाभ घेणे प्रत्येक भक्तासाठी अत्यंत मंगलदायी ठरते. आमच्यासाठी तो सुवर्णक्षण आज आला होता. मनोभावे तिन्ही नद्यांना साक्षी ठेऊन , गायत्री मंत्र उच्चारत पाण्यात शिरलो. यथासांग पूजा केली, सूर्याला अर्ध्य दिले, स्वतःची आत्मशुद्धी करत , स्वजनांसाठी , आप्तांसाठी आणि मित्रमंडळींसाठी आशीर्वाद घेतले.  गेले महिनाभर घेतलेला ध्यास, महाकुंभ मेळ्याचा केलेला अभ्यास, हितचिंतकांनी केलेली सर्वोपरी मदत आज कामी आली, कृतकृत्य झाल्यासारखे वाटले, हर हर गंगे! 🚩

मग लगेच आम्ही भौतिक जगातून आभासी जगात शिरलो आणि व्हाट्सअप वर मित्रांना व्हिडिओ कॉल केला. काहीजण बेडवरुन डोळे चोळत, काहीजण मॉर्निंग वॉक करत  असताना, तर काही अमेरिकेतून हैप्पी अवर्स मध्ये आम्हाला जॉईन झाले. सर्वाना संगमाचे दर्शन दिले, त्यांच्यासाठी एक डुबकी मारली आणि जेणेकरून त्यांची सर्व पापे पर्मनंट डिलीट होतील अशी प्रार्थना केली.  ज्या मित्रांनी घरच्यांबरोबर व्हिडिओ कॉल केला त्यांना एक ५ लिटर चा गंगाजलाचा कॅन घेऊन येण्याचा आदेश मिळाला. 

मग लगेच कॅन साठी शोधाशोध सुरु झाली आणि ईथेही युपी चा भैय्या कामी आला. जो भैय्या मुंबईत तुम्हाला दूध आणि भाज्या घरपोच देतो तो त्याच्याच गावात कॅन घेऊन तुमच्या मागे उभा होता, आणि नेहमीप्रमाणे २० रुपयाचा कॅन २५० रुपयाला ऑनलाईन यूपीआय  पेमेंट मध्ये तुमच्यासमोर गंगाजल भरून देत होता. मित्रांनी तीन कॅन चे पैसे स्कॅन करून गंगाजल बोटीवर चढवले आणि त्याचे फोटो व्हाट्सअप ला टाकले, घरच्यांनी लागेच त्या फोटो ला हात जोडले. मला वाटत मित्रांना आता खऱ्या अर्थाने पुण्य प्राप्त झाले होते, असो. 

यथावकाश सरस्वती घाटावर आलो, सर्व सामान व गंगाजल गाडीत ठेवले आणि महाकुंभच्या प्रवेश द्वारातून गर्दीत शिरलो. आता खऱ्या अर्थाने कुंभमेळ्याचा अनुभव आला. महाप्रचंड गर्दी संगम घाटाच्या दिशेने चालत होती. जाणारे आणि येणारे रस्ते भाविकांनी नुसते ओसंडून वाहत होते. आम्ही जवळच एका फूड कोर्ट मध्ये नाश्ता केला आणि संगमाच्या दिशेने चालू लागलो. एके ठिकाणी रिझर्व्ह बँकेचा स्टॉल होता, आत गेलो, थोडी माहिती घेतली, बऱ्याच योजना स्टार्टअप साठी होत्या आणि सर्व भाषेत माहिती देण्याची व्यवस्था होती, बरे वाटले. तसेच चालत चालत घाटाच्या दिशेने दोन अडीच किलोमीटर गेलो आणि ऊन वाढल्यामुळे मागे फिरलो.  

- चं दे














No comments:

Post a Comment