Saturday, March 1, 2025

महाकुंभ २०२५ : एक मैत्री पुर्ण अनुभव | भाग ३

महाकुंभ २०२५ : एक मैत्री पुर्ण अनुभव  | भाग ३

हर हर गंगे! 🚩🙏

#Prayagraj #TriveniSangam #SpiritualJourney #SanatanDharma

कुंभमेळ्याची व्यवस्था फारच उत्तम होती, प्रशासन आणि पोलीस, विविध संस्थांचे स्वयंसेवक आणि स्वच्छता कर्मचारी जागोजागी मदतीसाठी हजार होते, योगी आदित्यनाथांची शिस्त आणि प्रशासनावर ची पकड जाणवत होती. एकूणच महाकुंभ मेळ्याचा हा महाप्रचंड पसारा एका योगीने स्वतःच्या खांद्यावर लीलया पेलला होता हे नक्की. बरीच पायपीट करून आम्ही परत मुक्कामाच्या ठिकाणी आलो, दुपारचे जेवण घेतले आणि मस्तपैकी ताणून दिली.  माझे बाकीचे तीन मित्र आखाडे बघण्यासाठी बाहेर पडले, कधी ई रिक्षा तर कधी मोटार सायकल असे करत एका आखाड्यात धुनीचे दर्शन घेऊन आले. रात्री प्रयागराज च्या हॉटेल मध्ये जेवून परतीच्या प्रवासाच्या तयारीला लागलो.

परतीचा प्रवास म्हणून आम्ही जरा आरामात होतो पण गुगल मॅप ने बऱ्याच लाल रेषांनी आणि भलत्याच रस्त्याने जा म्हणून सांगितले आणि काळजी वाढली. प्रयागराज मधून बाहेर पडायला आणि ३० किमी नंतर हायवे ला लागायला तीन तास लागणार होते. शहराचा चांगला रास्ता सोडला आणि गावाच्या मातीतल्या रस्त्याने निघालो.  साधारणपणे दोन तासाच्या प्रवासानंतर यमुना नदीचा तात्पुरता बनवलेला पिपा पूल लागला. नदीच्या पात्रात वाळूत दोन किलोमीटर आत लोखंडाचे पत्रे टाकून रास्ता केला आहे. एकावेळी एकच गाडी त्यावरून जाऊ शकते. इथे मात्र आम्हाला ट्रॅफिक जॅम चा अनुभव आला. गाड्या पुढे मागे करून, एक साईड वाळूत उतरवून गाड्या जात होत्या. दीड एक तासाच्या प्रयत्नानंतर आम्ही पिपा पूल पार केला, एक मेंढ्यांचा कळप हि आडवा गेला आणि शेवटी मुख्य रस्त्याला लागलो.  प्रयागराज कडे जाताना रिवा शहरातून गेलो होतो परंतु आता रिवा बायपास वरून जाताना  प्रचंड हाल झाले. बायपास हा अगदीच नावाला होता, खड्डे जागोजागी होते. शेवटी एकदाचे नागपूरला मुक्कामाला पोहोचलो. नैवद्यम नावाच्या प्रसिद्ध हॉटेल मध्ये रात्रीचे जेवण घेतले. 

प्रवासाचा शेवटचा दिवस समृद्धी महामार्गामुळे सुफळ संपूर्ण झाला.  आमच्या पैकी प्रत्येकाने काही शे किलोमीटर गाडी चालवली आणि १० तासात ठाण्यात पोहचलो. पुण्याच्या मित्रासाठी ठाणे-पुणे टॅक्सी बुक केली आणि घरी जेवायला बसलो. तीस मिनिटात टॅक्सिवाला आला, त्याला म्हंटले मित्र कुंभमेळ्यावरून आला आहे, नीट घेईऊन जा , तर त्याने अगोदर खाली वाकून मित्राचे पाय धरले आणि आशीर्वाद घेतला. अश्याप्रकारे आमच्या प्रवासाची सांगता झाली. 

- चं दे








महाकुंभ २०२५ : एक मैत्री पुर्ण अनुभव | भाग २

महाकुंभ २०२५ : एक मैत्री पुर्ण अनुभव  | भाग २  

हर हर गंगे! 🚩🙏

#Prayagraj #TriveniSangam #SpiritualJourney #SanatanDharma

कुंभमेळ्यामुळे प्रयागराज मध्ये झालेली विकास कामे आणि प्रचंड गर्दीमुळे लोकांची होणारी गैरसोय बघत आम्ही १२ तासांच्या प्रवासानंतर संरक्षण खात्याच्या सप्लाय डेपो  च्या गेट वर पोहोचलो. आमची मुक्कामाची सोय सैनिकांच्या बराकी मध्ये सरकारी पाहुणे म्हणून झाली होती. रीतसर ओळख परेड झाली, गेट उघडले आणि सरकारी इतमामात गेस्ट हाऊस मध्ये उतरलो. आपले पंतप्रधान दिवाळी सैनिकांबरोबर साजरी करतात त्याची आठवण आली आणि आपणही थोडे व्हीआयपी झाल्यासारखे वाटले, असो. कोणे एकेकाळी एन सी सी मध्ये ३ वर्षे काढली असल्यामुळे ईथली शिस्त आणि स्वच्छता याचा अनुभव गाठीशी होता म्हणून लगेच जुळवून घेता आले. 

ठाण्यापासून प्रयागराज पर्यंतचा सुखकर प्रवास आणि झालेल्या सोयीबद्दल देवाचे आणि मित्रांचे आभार मानत असतानाच अजून एक बातमी थडकली. एक पाहुणचाराचा  भाग म्हणून यजमानांनी आमचे अमृत स्नान हे सरस्वती घाटावरून बोटीने करून देण्याचे ठरविले होते. रिपोर्टींग दुसऱ्या दिवशी सकाळी साडेचार चे असल्यामुळे, आम्ही झटपट जेवण उरकून , सकाळची तयारी करून झोपी गेलो. 

सकाळी पाच वाजता आम्ही सरस्वती घाटावर पोहोचलो, गाडी जवळच पार्क केली आणि पन्नास एक पायऱ्या उतरून बोटीची वाट बघत राहिलो. घाट फारच सुंदर होता, जवळच्याच नैना पूलाला सुंदर विद्युत रोषणाई केलेली होती, समोरचा अरैल घाट भाविकांनी अगदी भरून वाहत होता. मग घाटावर तुझा फोटो, माझा फोटो, आपला फोटो,  पुलाचा फोटो असले चाळे करत वेळ काढला आणि तेव्हढ्यात दोन नावाडी एक एंजिनाची बोट घेऊन आले.  तिकीट अगोदरच काढली असल्यामुळे चौघांना जागा लगेच मिळाली आणि आणखी एक कुटुंबाबरोबर आमचा प्रवास त्रिवेणी संगमाच्या दिशेने सुरु झाला. अडीच किमी चा तो प्रवास पुढच्या तीस मिनिटात पूर्ण करू असे नावाडी म्हणायला आणि भोंग्यावरून 'मागे फिरा' असा जल पोलिसांचा आदेश यायला एकच गाठ पडली.   नावाड्याने आमची बोट जल पोलिसांच्या जवळ नेत माहिती काढली. आम्ही व्ही आय पी घाटावर जाणार होतो पण आमच्या अगोदर व्हीव्हीआयपिंचा चा नंबर असल्यामुळे आम्हाला नऊ वाजे पर्यंत प्रवेशबंदी होती.  तसा अजून अंधारच होता पण रंग उडालेले आमचे चेहरे मात्र स्पष्ट दिसत होते. नावाडी अनुभवी असल्यामुळे त्याने चिकाटीने पुढच्या एका तासात इकडे तिकडे फेऱ्या मारल्या आणि जल पोलिसांना विनंती  करून शेवटी एकदाचे त्रिवेणी संगमावर पोहचवले. 

सूर्योदयाच्या मुहूर्तावर आम्ही  गंगा, यमुना आणि अदृश्य सरस्वती यांच्या संगमस्थळी – त्रिवेणी संगमावर  उतरलो. उगवत्या सूर्याला नमस्कार केला आणि स्नानाची तयारी सुरु केली.  त्रिवेणी संगम येथे अमृतस्नान म्हणजे केवळ पाण्यात स्नान करणे नव्हे, तर आत्मशुद्धी, श्रद्धा आणि आध्यात्मिक उन्नतीचा एक सोहळा आहे. त्यामुळे महाकुंभाच्या पवित्र पर्वावर या स्नानाचा लाभ घेणे प्रत्येक भक्तासाठी अत्यंत मंगलदायी ठरते. आमच्यासाठी तो सुवर्णक्षण आज आला होता. मनोभावे तिन्ही नद्यांना साक्षी ठेऊन , गायत्री मंत्र उच्चारत पाण्यात शिरलो. यथासांग पूजा केली, सूर्याला अर्ध्य दिले, स्वतःची आत्मशुद्धी करत , स्वजनांसाठी , आप्तांसाठी आणि मित्रमंडळींसाठी आशीर्वाद घेतले.  गेले महिनाभर घेतलेला ध्यास, महाकुंभ मेळ्याचा केलेला अभ्यास, हितचिंतकांनी केलेली सर्वोपरी मदत आज कामी आली, कृतकृत्य झाल्यासारखे वाटले, हर हर गंगे! 🚩

मग लगेच आम्ही भौतिक जगातून आभासी जगात शिरलो आणि व्हाट्सअप वर मित्रांना व्हिडिओ कॉल केला. काहीजण बेडवरुन डोळे चोळत, काहीजण मॉर्निंग वॉक करत  असताना, तर काही अमेरिकेतून हैप्पी अवर्स मध्ये आम्हाला जॉईन झाले. सर्वाना संगमाचे दर्शन दिले, त्यांच्यासाठी एक डुबकी मारली आणि जेणेकरून त्यांची सर्व पापे पर्मनंट डिलीट होतील अशी प्रार्थना केली.  ज्या मित्रांनी घरच्यांबरोबर व्हिडिओ कॉल केला त्यांना एक ५ लिटर चा गंगाजलाचा कॅन घेऊन येण्याचा आदेश मिळाला. 

मग लगेच कॅन साठी शोधाशोध सुरु झाली आणि ईथेही युपी चा भैय्या कामी आला. जो भैय्या मुंबईत तुम्हाला दूध आणि भाज्या घरपोच देतो तो त्याच्याच गावात कॅन घेऊन तुमच्या मागे उभा होता, आणि नेहमीप्रमाणे २० रुपयाचा कॅन २५० रुपयाला ऑनलाईन यूपीआय  पेमेंट मध्ये तुमच्यासमोर गंगाजल भरून देत होता. मित्रांनी तीन कॅन चे पैसे स्कॅन करून गंगाजल बोटीवर चढवले आणि त्याचे फोटो व्हाट्सअप ला टाकले, घरच्यांनी लागेच त्या फोटो ला हात जोडले. मला वाटत मित्रांना आता खऱ्या अर्थाने पुण्य प्राप्त झाले होते, असो. 

यथावकाश सरस्वती घाटावर आलो, सर्व सामान व गंगाजल गाडीत ठेवले आणि महाकुंभच्या प्रवेश द्वारातून गर्दीत शिरलो. आता खऱ्या अर्थाने कुंभमेळ्याचा अनुभव आला. महाप्रचंड गर्दी संगम घाटाच्या दिशेने चालत होती. जाणारे आणि येणारे रस्ते भाविकांनी नुसते ओसंडून वाहत होते. आम्ही जवळच एका फूड कोर्ट मध्ये नाश्ता केला आणि संगमाच्या दिशेने चालू लागलो. एके ठिकाणी रिझर्व्ह बँकेचा स्टॉल होता, आत गेलो, थोडी माहिती घेतली, बऱ्याच योजना स्टार्टअप साठी होत्या आणि सर्व भाषेत माहिती देण्याची व्यवस्था होती, बरे वाटले. तसेच चालत चालत घाटाच्या दिशेने दोन अडीच किलोमीटर गेलो आणि ऊन वाढल्यामुळे मागे फिरलो.  

- चं दे














महाकुंभ २०२५ : एक मैत्री पुर्ण अनुभव | भाग १

 महाकुंभ २०२५ : एक मैत्री पुर्ण अनुभव 

भाग १ 

हर हर गंगे! 🚩🙏

#Prayagraj #TriveniSangam #SpiritualJourney #SanatanDharma

महा कुंभ मेळ्याला जायचेच असा काही आमचा 'पण' नव्हता परंतु आलोच आहोत या भारत वर्षात जन्माला तर जाऊन एकदा डुबकी मारू असे ठरवले. जेव्हा मी महाकुंभ ला जातो असे जाहीररित्या सांगितले तेव्हा सर्वानी त्यास होकार दिला आणि सर्व पापे गंगेत सोडून ये असा आदेश दिला. 

मग प्रश्न आला तो कि मी पाप कधी केल आणि का केल हा. बायको मुले म्हणाली कि आमच्या साठी तुम्ही पाप कधीच केलं नाही, आम्ही येणार नाही. नातेवाईक म्हणाले आमच्या साठी तू काहीच केले नाहीस तर पापाचा प्रश्न येतो कुठे आणि आम्ही तुझा खर्च का उचलायचा. आता राहिले मित्र, त्यांच्यासाठी तर पापांचे घडे भरले आणि त्यांनी ते मान्य हि केले. 

मग काय, मित्रांना घेऊनच अमृत स्नान करायचे पक्के ठरवले आणि तयारीला लागलो. दोन चार व्हाट्सअप ग्रुप मध्ये  "कोणी अंघोळीला येणार का, नदीला  १४०० किमी लांब जायचे आहे" असा मेसेज टाकला आणि कोणी गळाला लागतो का याची वाट पाहत बसलो.  काही मित्र म्हणाले 'आम्ही फक्त घरीच अंघोळ करतो', काही म्हणाले 'घरचे सोडणार नाहीत', बाकीचे म्हणाले 'घरून कपडे दिले तर येणार पण फुकट नेणार का? '. होय नाय करता करता एक पुण्याचा आणि दोन ठाण्याचे मित्र तयार झाले आणि मी कामाला लागलो. 

चड्डी बनियन टॉवेलात गुंडाळून विहिरीवर अंघोळीला जाण्याचा अनुभव गाठीशी होता त्यामुळे तयारी करताना फारसा त्रास झाला नाही.  पुण्याच्या मित्राने त्याच्या पुतण्याला आमची प्रयागराज मध्ये सोय कर म्हणून गळ घातली आणि आमची राहण्याची काळजी मिटली. घरच्याच वाहनाने प्रवास करायचा असल्यामुळे ते आतून बाहेरून धुऊन घेतले आणि तेल पाणी केले.  पुण्याचा मित्र अकरा तारखेला रात्री मुक्कामाला आला आणि सकाळी उठून आम्ही नागपूच्या रस्त्याला लागलो.  ठाणे नाशिक तसा पायाखालचा रास्ता आणि वाहनांची गर्दीही कमी , त्यामुळे इगतपुरी ला समृद्धी महामार्गाला जाणे झटकन झाले. साधारणतः सात तासाच्या नागपूर पर्यंत च्या प्रवासात एक तास गडकरी साहेबांना, देवा भाऊंना, शिंदे साहेबांना धन्यवाद देण्यात गेले. पुढचा एक तास सिमेन्ट च्या रस्त्यामुळे टायर कंपन्यांचे शेअर्स वर जातील का आणि आपण किती घ्यायला हवे यावर खर्च झाला.  नंतरचा काही वेळ समृद्धी महामार्गावर हॉटेल कुठे टाकता येईल , मेनू काय ठेवायचा आणि आपल्यापैकी कोण चालवणार यावर विचार मंथन केले. 

कसे काय ठाऊक पण आमच्यापैकी एकाला लक्षात आले कि आपण सिवनी ला मुक्काम कुठे करायचा हेच ठरवले नाही. मग काय , लगेच ऑनलाईन हॉटेल बुकिंग करून टाकले आणि नागपूर - जबलपूर रोडला लागलो .  सात वर्षांपूर्वी मी तीन दिवस पेंच अभयारण्यात राहून आलो होतो म्हणून आता पेंच वरून जाताना फारशी भीती वाटली नाही. रात्री नवाला सिवनी ला पोहोचलो आणि लगेच हॉटेलच्या रूफटॉप वर जेवायला गेलो. उत्तम जेवण पण भूक मेल्यावर आणून दिले त्यामुळे आमचे चेहरे बघण्यासारखे झाले होते, असो. 

सकाळी सिवनी बस स्थानाकच्या आजूबाजूला फिरून आलो, तर्री पोह्याचा आस्वाद घेतला आणि 'इंडियन कॉफी हाऊस' मध्ये चहापान केले. साधारणपणे नऊ वाजता प्रयागराज कडे प्रयाण केले. मारुती रायाचे चित्र असलेले भगवे झेंडे आपल्या चार चाकी आधुनिक रथावर लावून दक्षिण भारतातून बरेच लोक आम्हाला मागे टाकून वायुवेगाने जाताना पहिले आणि मन भरून आले. दुपारचे जेवण रेवा मधल्या प्रसिद्ध हॉटेल मध्ये घ्यायचे म्हणून गाडी आतल्या रस्त्याला वळवली. अर्ध्या तासाच्या अथक शोधमोहिमेनंतर कळले कि गुगलने ५ रेटिंग दिलेले हॉटेल दोन वर्षांपूर्वीच बंद झाले आहे. मग परत हायवे ला आलो आणि जेवण उरकले.

घरापासून ऑफिस पर्यंत प्रत्येकाचा यु ट्युबरचे रील बघून आम्ही ३०० किमी ट्रॅफिक मध्ये कसे अडकणार, ३० किमी कसे चालणार याचा आमच्या व्हाट्सअप वर भडीमार चालू होता.  आम्ही प्रयागराज पासून २५ किमी पर्यंत पोहोचलो आणि चहा साठी ब्रेक घेतला. साहजिकच पुढे काय वाढून ठेवले असणार याची चिंता करत थोडी चौकशी केली तर् चहा वाला म्हणाला ४ किमी वर पोलीस गाड्या थांबऊन बाजूच्या शेतात पार्किंग करायला लावत आहेत. आता अंघोळीला जातो म्हणून घरातून निघालो तर होतो मग परत कसे जाणार.  

निघालो, म्हंटले जे काही व्हायचे ते होईल, ५ किमी च्या पुढे गेलो , पोलीस चेक पोस्ट आले आणि गाडी सरळ त्यातून पुढे गेली, कोणी हात केला नाही, गाड्या अडवल्या नाहीत आणि ट्रॅफिक पण सुरळीत चालू होते. आता रस्त्यावर वाहनांची गर्दी वाढत चालली होती, कधीही पोलीस थांबवतील असे वाटत होते, पण तसे काही झाले नाही. लवकरच आम्ही मुख्य हायवे सोडून जुन्या नैनी पुलावर जाण्यासाठी वळलो.  ईथे मात्र प्रचंड ट्रॅफिक होते, ई-रिक्षांची संख्या खूपच होती पण एंजिनाचा आवाज आणि धूर अजिबात नव्हता.  अर्ध्या तासाच्या प्रयत्नानंतर आम्ही पुलावर पोहोचलो, नैनी पूल हा दीडशे वर्ष जुना असून तो डबल डेकर आहे, वरून भारतीय रेल्वे जाते आणि खालून वाहनांसाठी सोय केली आहे. चार वर्षांपूर्वी या पुलाची डागडुजी केलेली आहे आणि तो चांगल्या स्थितीत आहे. नदी पार करायला आम्हाला २० मिनिटे लागली आणि आम्ही मुक्कामाच्या रस्त्याला लागलो. 

-  चं दे 








Saturday, October 8, 2016

Whatsapp मोर्चा.....


फोनची रिंग बराच वेळ वाजत होती. शेवटी एकदाची तिला जाग आली. उठून मोबाइल हातात घेतला आणि डोळे चोळत कुणाचा नंबर आहे ते बघू लागली. रात्रीचे दोन वाजले होते. फोन परगावावरून नवऱ्याने केला हे तिला कळले.
"हं , बोला".
"काय जेवणं झाली कि नाय? " नवरा .
"अहो रात्रीचे दोन वाजलेत, अर्धी झोप झाली आणि हे काय  विचारताय? "
"बरं ऐक , माझी साऊथ आफ्रिकेची ट्रिप अजून चार दिवस वाढली आहे. "
"हं " ती.
"उदयाला मोर्चाला जायचंच , कळलं का? मला whatsapp वर मित्रांचे मेसेज यायला लागलेत, पप्पा मम्मी आणि वाहिनी येणार आहेत का म्हणून? "
"बरं बघु उद्या सकाळी " ती.
"ते काय चालायचं नाय. आपल्याला तिथे धंदा करायचया आहे. उगाच कुणाशी पंगा नको. आणि जातीशी तर अजिबात नको. गड्याला मी whatsapp मेसेज पाठवला आहे. गाडी तयार ठेवायला सांगितली आहे, भगवा झेंडा पण लावणार आहे त्यो. वेळेत निघायचे आणि लवकर माघारी फिरायचं. उगाच गर्दीत अडकायला नको".
"",
"बरं झोप आता. पण दर अर्ध्या तासाला मोर्चाचे फोटो पाठव whatsapp वर, उद्या कुणी म्हणायला नको आपण मोर्चाला नव्हतो म्हणून. मला आमच्या ग्रुप वर शेअर करायचे आहेत."

सकाळी गडी एका मित्राबरोबर गाडी घेऊन आला. गाडीला भगवा झेंडा आणि झेंडूच्या फुलांचा हार होता. वहिनींनी दोघांना बशी भरून पोहे आणि चहा दिला.
आप्पानी घरात हाक मारली "गाडी आली आहे, लवकर चला नाहीतर गाडी लय लांब उभी करायला लागेल." आणि गड्याला म्हणाले " अरे हा कोण बरोबर आणला आहेस ?'.
गडी म्हणाला "आप्पा , हा माझा मित्र ड्राइवर आहे. तो तुम्हाला मोर्च्याला घेऊन जाणार आहे."
आप्पानी विचारल " पण तू का येत नाहीस ?". गडी गप्पच.
आप्पानी परत विचारल " अरे तुला कुठे जायच आहे का? बोल कि जरा".
गडी चाचरत म्हणाला "मला मोर्च्याला येता येणार नाही. घरचे म्हणतायत उगाच भावकीत कटकट नको. अजून बहिणीचं कुठं ठरलं नाय, तीच उरके पर्यंत कुठे भानगडीत पडू नको म्हणून सांगितलंय. ".
आता आप्पाना सर्व गोष्टीचा उलगडा झाला. ते म्हणाले "काही हरकत नाही. तू जा घरी" आणि त्याचा मित्राकडे वळून विचारले " तुला काही अडचण नाही ना?".
मित्र  म्हणाला "नाही, आंम्ही पण तुमच्यातलाच आहोत" आणि तो आपला गोतावळा सांगू लागला.

ऊन पावसाचं खेळ चालू होता, गर्दी तुडुंब होती, लोकांचा महासागर उसळला होता. असली गर्दी पेपर मध्ये फक्त गणपती विसर्जनाला आणि आंबेडकर जयंतीलाच छापून यायची. लोक आज स्वतः त्याचा भाग बनून अनुभव घेत होते. गाडी पटकन काढता येईल अश्या ठिकाणी पार्क करायला सांगून वाहिनी सासू आणि सासऱ्यांबरोबर मोर्च्यात सामील झाल्या. वहिनींनी एक सेल्फी काढून whatsapp वर पोस्ट केला आणि भावाला आपण नक्की कोठे आहोत ते सांगितले.  हा भाऊ दोनदा mpsc ला अपयश आल्यामुळे आरक्षणावर प्रचंड चिडलेला होता. सध्या तो जमीन खरेदी विक्री च्या उद्योगात जम बसवण्याच्या प्रयात्नात आहे. लांबूनच वहिनींना एक ओळखीचा चेहरा दिसला. तो एक डॉक्टर होता आणि आता तो मोर्च्यातल्या लोकांना पाणी देत होता.

मोर्च्या पुढे सरकत राहिला आणि वाहिनी भूतकाळात जाऊ लागल्या. तीन वर्षांपूर्वीच हे डॉक्टरचे स्थळ वहिनींना सांगून आले होते. पंधरा लाख रुपये हुंडा आणि लग्न करून द्या म्हणाले. वहिनींच्या वडिलांची तेवढी ऐपत नव्हती. तेव्हा भाऊ म्हणाला होता कि मला जर तेवढेच मोठे स्थळ आले तर आपण ह्यांना हो म्हणू. पुढे काहीच झाले नाही. मग काही महिन्यांनी हे स्थळ सांगून आले. खानदान तोलामोलाच होत, मुलगा चांगला शिकलेला होता, काही एकर जमीन होती, स्वतःचा व्यवसाय होता, दोन बहिणींचे लग्न झाले होते आणखी काय हवे. आता लग्नाला वर्ष झाले होते आणि वहिनींना सर्व कळून चुकले होते. नवऱ्याने एका नातेवाईकाच्या कॉलेज मध्ये आर्टस् आणि एमबीए डिग्री मिळवली होती. एमबीए डिग्री असून हि नवरा एक ई-मेल लिहू शकत नव्हता. जमिनीवर पन्नास लाखाचं कर्ज काढून नवीन धंदा पार्टनरशिप मध्ये टाकला आहे. उधारीचे वसुली झाली नाही म्हणून गेल्याच महिन्यात घरातले दागिने गहाण ठेऊन देणी भागवली होती. डीलर च्या ग्रुप ने दोन लाख भरून साऊथ आफ्रिकेची ट्रिप ठरवली आणि हे दोन पार्टनर ट्रिपला गेले होते.
फोनची रिंग वाजली आणि वाहिनी भानावर आल्या. फोन घेतला आणि पलीकडून आवाज आला "दोन तास झाले, अजून मोर्च्याच्या फोटो नाही आला whatsapp वर, काय कुठे हॉटेलात बसला का काय? "

- चं दे