Saturday, January 3, 2026

गुजरात पर्यटन म्हणजे काय रे भाऊ ?

गुजरात पर्यटन व्यवसाय म्हणजे एक अजब रसायन आहे.  इथल्या लोकांनी स्वतःसाठी हा व्यवसाय सुरू केला आहे आणि त्याचा ते पुरेपूर उपभोग उपयोग घेत आहेत असे थोडक्यात म्हणता येईल. नुकताच रन ऑफ कच्छ येथे जाण्याचा योग आला, किंवा सहा महिन्याच्या प्लॅनिंग नंतर १४  कुटुंबांनी मिळून हा योग घडवून आणला, कारण होते मित्रांचे कौटुंबिक वार्षिक स्नेहसंमेलन.  काही मित्र अगोदरच तिथे जाऊन आले होते आणि त्यांनी नकार कळवला होता परंतु इतरांच्या आग्रहास्तव  ते पण आमच्या बरोबर आले.  आम्ही सर्व जण स्वतःच्या गाडीने कोइंबतूर, बेंगलोर , मुंबई,  पुणे , चंदीगड अशा  वेगवेगळ्या ठिकाणावरून रस्त्याने प्रवास करून तिथे पोहोचले होतो. 

पार्किंग मध्ये गाडी उभी करून मुख्य दरवाजावर पोचलो, पाहतो तर काय हा तर एखाद्या सिनेमाचा सेट असावा असे वाटत होते दरवाजावरती अगदी गुजराती पद्धतीने गरबा आणि सनई चौघडे पद्धतीने आमचे स्वागत झाले. मला वाटते ते सर्वजण आम्हाला मनातल्या मनात हसत होते हे नंतर अनुभवावरून कळले , असो. रिसेप्शन मध्ये ओळखपत्रांची देवाण-घेवाण झाली आणि त्यांनी आम्हाला पुढच्या दोन दिवसांचं शेड्युल सांगितलं . आम्ही त्यांच्या तावडीत सापडलो होतो, आता ते सांगतील तेच खायचं, त्याच वेळेत खायचं,  ठरलेल्या वेळेला उठायचं आणि ते नेतील त्याच ठिकाणी जायचं, तुमच्या इच्छेवरून इथे काहीही होत नाही याचा प्रत्यय आला.  म्हटलं तसं तर तसं, हाही अनुभव घेऊन बघू आणि आम्ही टेन्ट सिटी च्या रस्त्याला लागलो.  तंबूंची एक वस्ती आमच्यासाठी ठेवली होती तिथे पर्यंत एका बॅटरी ऑपरेटेड गाडीने आम्हाला सोडण्यात आले.  

आहाहा,  त्या जागेचे वर्णन थोडक्यात असे करता येईल की जसे आपण एखाद्या ऐतिहासिक चित्रपटातल्या मुघलांच्या छावणीत रहायला आलो आहोत .  साधारणता अर्धगोलाकार ३२ तंबू ओळीने लावले होते आणि मधल्या भागात सांस्कृतिक कार्यक्रमासाठी एक स्टेज बनवले होते ज्याचा उपयोग पुढच्या दोन दिवसात कशासाठीही झाला नाही.  तंबूला बाहेर दोन कंदील लावले होते आणि त्यात विजेचे बल्ब होते, सांगायचे म्हणजे काय तर फील गुड फॅक्टर म्हणजे हे दोन कंदील. तंबूला एक बाल्कनी सदृश्य जागा होती आणि त्याला जाळीदार दरवाजा होता. त्या बाल्कनीत दोन लाकडी आराम खुर्च्या ज्या बहुतेक आम्हीच कधीतरी घरात अडचण नको म्हणून कुणाला तरी देऊन टाकलेल्या इथे दिसत होत्या .

तंबूच्या आत मध्ये प्रवेश केल्यावर डाव्या बाजूला एक पलंग एखाद्या छपरी कारागिराने नावाप्रमाणे बनवला होता आणि त्याला पडदे सोडले होते.  उजव्या बाजूला एक चौरंग आणि दोन लाकडी खुर्च्या मांडल्या होत्या . त्याच्यामागे एक लाकडी टेबल ज्यावरती चहा कॉफी बनवण्याची मशीन आणि इतर गोष्टी ठेवल्या होत्या . तंबूच्या मागच्या भागात टॉयलेट साठी एक वेगळी खोली आणि सामान ठेवण्यासाठी एक लाकडी टेबल आणि त्याची वेगळी जागा होती. वेस्टर्न टॉयलेट आणि हॉलच्या टेबलावर असलेले चहा कॉफी चे भांडे या दोन गोष्टी आम्ही तुम्हाला इंटरनॅशनल स्टॅंडर्डच्या सोयी दिल्या आहेत याची आठवण करून देत होत्या .  

या कापडी तंबूची एक खासियत म्हणजे ते एकमेकांना इतके खेटून होते कि आजूबाजूचे दोन्ही तंबू मध्ये चाललेली कुजबुज, सोडलेले सुस्कारे आणि इतर धीर गंभीर आवाज अगदी स्पष्ट ऐकायला येत होते. थोडक्यात काय तर प्रत्येक तंबू आपल्या आजूबाजूच्या तंबूंच्या फिलिंग मध्ये सहज सामील होऊ शकेल अशी ती योजना होती .

आता वळूया खाण्याकडे.  इथे मात्र सर्वांनी एकत्र येऊन भोजन घ्यावे म्हणून एक डायनिंग हॉल ची योजना केली होती . सकाळ , दुपार आणि  संध्याकाळच्या जेवणाच्या वेळा ठरलेली होत्या . जो पहिला जाईल आणि वेळेत खाईल त्यालाच पोटभर जेवायला मिळेल अशी सिस्टिम होती, बाकीच्यांच काही खरं नव्हतं, असो . 

अमिताभ बच्चन ने काही वर्षांपूर्वी गुजरातला या म्हणून जो काही टाहो फोडला होता त्याचं खरं कारण या डायनिंग हॉलमध्ये सापडतं . इथल्या जेवणाला तुम्ही फक्त खाण्याचे पदार्थ ओळीने मांडून ठेवले आहेत या पलीकडे काहीही नावे ठेवू शकत नाही कारण ते सर्व पदार्थ चवीला एकसारखेच लागत होते.  सुरुवात नेहमीप्रमाणेच लोणचे, खाकरा आणि वेगवेगळ्या प्रकारचे सॅलड यापासून होते, नंतर लगेच व्हेज मिक्स भाजी, सब्जी, येल्लो डाल  आणि कढी  यापासून ते दाल खिचडी पर्यंत गोष्टींचा आस्वाद घेता  आणि मग कोणीतरी येऊन सांगतो की अरे स्टार्टर्स त्या दुसऱ्या टोकाला आहेत. मग उत्सुकतेपोटी तुम्ही तिकडे जाऊन पाहता तर तिथे वडा आणि मुंग भाजी तुमची वाट पाहत असतात., जोडीला टोमॅटो केचप आणि पुदिना चटणी असते . इथे जरी बुफे पद्धतीने तुम्ही स्वतः वाढून घेत असलात तरी पुढची रांग आपोआप थांबली जाते. जरा वाकून पाहिल्यावर असे दिसते कि आपल्याच रांगेतला एकजण त्याच्या आजूबाजूच्या चार जणांना सर्वात चांगली डिश भरभरून वाढत असतो .  आता जर तुम्हाला मुंबईतल्या कुठल्या विशिष्ट लग्नाच्या आमंत्रणाची आठवण झाली असेल तर तो निव्वळ योगायोग समजावा. 

डायनिंग हॉलमध्ये फक्त पाहुण्यांसाठी एक खेळ कायम सुरू असतो तो म्हणजे संगीत खुर्ची. जर तुम्ही ताट घेऊन जेवायला बसायला जागा शोधत असाल तर तुम्हाला खेळ खेळावाच लागतो. बाकी स्थानिक लोकांना हे अगोदरच माहीत असल्यामुळे ते अगोदर जागा पकडतात आणि मग ताट वाटी घेऊन हॉलवर फिरत राहतात, असो .

गोड पदार्थांचे काउंटर हा अशा गुप्त जागी आहे कि शोधणाऱ्याला तिथे बक्षीस दिले जाते . इथेही माती सदृश्य भांड्यातून दिल जाणार केसर दूध आहेच थोडक्यात काय तर सर्व भारतातले काही ना काही खाद्यपदार्थ इथे सामावले आहेत तेवढाच आपला नॅशनल टच . 

इथले कर्मचारी नियमाचे मात्र फार पक्के आहेत, बरोबर दहा वाजता जेवणाचा काउंटर बंद म्हणजे बंद, दहाला पाच मिनिटे कमी असतानाच ते काउंटर वरती येऊन उभे राहतात.  मला तर असे वाटते की जर १० नंतर तुमच्या ताटात काही पदार्थ शिल्लक राहिले तर येऊन ते ताटातले पदार्थ घेऊन जात असावेत.  

अरे हो एक सांगायचे राहूनच गेले.  इथेही स्पीकर वरून अमुक बस तमुक वाजता सुटणार आहे ,  शेवटची बस पुढच्या दहा मिनिटांत आहे तरी ज्यांना टेन्ट सिटी चे सर्व पैसे वसूल करायचे आहेत त्यांनी हात धुवा आणि लगेच बस पकडा अशी सक्त ताकित दिलेली असते .  बाकी तुम्ही पर्यटक असलात तरी तुम्हाला शिस्त लावण्याची जबाबदारी मात्र गुजरात पर्यटन विभागाने स्वतः कडे घेतली आहे हे नक्की .  

गंमत म्हणजे इथे कंप्लेंटही तुम्हाला गुजराती सोडून कोणत्याही भाषेत करता येते आणि उत्तर मात्र गुजराती भाषेतच मिळणार. बाकी गुजराती भाषेतला कोणीही कंप्लेंट करण्याच्या भानगडीत पडतच नाही तो वेळेवर येऊन दहाच्या अगोदर पोटभर जेवून घेतो .

जर तुम्ही राज्याबाहेरचे पर्यटक असाल तर तुमच्याकडे खूप पैसा आहे आणि आम्ही तुम्हाला तो खर्च करण्याची संधी दिली आहे या भावनेतून चालवला जाणारे व्यवसाय म्हणजे गुजरातचे पर्यटन असे माझे प्रांजळ मत आहे .  

आपला 

चं  दे 

ताजा कलम  : कालो डोंगरावर लवकरच फिरायला जाऊ या ! 




No comments:

Post a Comment