Saturday, October 8, 2016

Whatsapp मोर्चा.....


फोनची रिंग बराच वेळ वाजत होती. शेवटी एकदाची तिला जाग आली. उठून मोबाइल हातात घेतला आणि डोळे चोळत कुणाचा नंबर आहे ते बघू लागली. रात्रीचे दोन वाजले होते. फोन परगावावरून नवऱ्याने केला हे तिला कळले.
"हं , बोला".
"काय जेवणं झाली कि नाय? " नवरा .
"अहो रात्रीचे दोन वाजलेत, अर्धी झोप झाली आणि हे काय  विचारताय? "
"बरं ऐक , माझी साऊथ आफ्रिकेची ट्रिप अजून चार दिवस वाढली आहे. "
"हं " ती.
"उदयाला मोर्चाला जायचंच , कळलं का? मला whatsapp वर मित्रांचे मेसेज यायला लागलेत, पप्पा मम्मी आणि वाहिनी येणार आहेत का म्हणून? "
"बरं बघु उद्या सकाळी " ती.
"ते काय चालायचं नाय. आपल्याला तिथे धंदा करायचया आहे. उगाच कुणाशी पंगा नको. आणि जातीशी तर अजिबात नको. गड्याला मी whatsapp मेसेज पाठवला आहे. गाडी तयार ठेवायला सांगितली आहे, भगवा झेंडा पण लावणार आहे त्यो. वेळेत निघायचे आणि लवकर माघारी फिरायचं. उगाच गर्दीत अडकायला नको".
"",
"बरं झोप आता. पण दर अर्ध्या तासाला मोर्चाचे फोटो पाठव whatsapp वर, उद्या कुणी म्हणायला नको आपण मोर्चाला नव्हतो म्हणून. मला आमच्या ग्रुप वर शेअर करायचे आहेत."

सकाळी गडी एका मित्राबरोबर गाडी घेऊन आला. गाडीला भगवा झेंडा आणि झेंडूच्या फुलांचा हार होता. वहिनींनी दोघांना बशी भरून पोहे आणि चहा दिला.
आप्पानी घरात हाक मारली "गाडी आली आहे, लवकर चला नाहीतर गाडी लय लांब उभी करायला लागेल." आणि गड्याला म्हणाले " अरे हा कोण बरोबर आणला आहेस ?'.
गडी म्हणाला "आप्पा , हा माझा मित्र ड्राइवर आहे. तो तुम्हाला मोर्च्याला घेऊन जाणार आहे."
आप्पानी विचारल " पण तू का येत नाहीस ?". गडी गप्पच.
आप्पानी परत विचारल " अरे तुला कुठे जायच आहे का? बोल कि जरा".
गडी चाचरत म्हणाला "मला मोर्च्याला येता येणार नाही. घरचे म्हणतायत उगाच भावकीत कटकट नको. अजून बहिणीचं कुठं ठरलं नाय, तीच उरके पर्यंत कुठे भानगडीत पडू नको म्हणून सांगितलंय. ".
आता आप्पाना सर्व गोष्टीचा उलगडा झाला. ते म्हणाले "काही हरकत नाही. तू जा घरी" आणि त्याचा मित्राकडे वळून विचारले " तुला काही अडचण नाही ना?".
मित्र  म्हणाला "नाही, आंम्ही पण तुमच्यातलाच आहोत" आणि तो आपला गोतावळा सांगू लागला.

ऊन पावसाचं खेळ चालू होता, गर्दी तुडुंब होती, लोकांचा महासागर उसळला होता. असली गर्दी पेपर मध्ये फक्त गणपती विसर्जनाला आणि आंबेडकर जयंतीलाच छापून यायची. लोक आज स्वतः त्याचा भाग बनून अनुभव घेत होते. गाडी पटकन काढता येईल अश्या ठिकाणी पार्क करायला सांगून वाहिनी सासू आणि सासऱ्यांबरोबर मोर्च्यात सामील झाल्या. वहिनींनी एक सेल्फी काढून whatsapp वर पोस्ट केला आणि भावाला आपण नक्की कोठे आहोत ते सांगितले.  हा भाऊ दोनदा mpsc ला अपयश आल्यामुळे आरक्षणावर प्रचंड चिडलेला होता. सध्या तो जमीन खरेदी विक्री च्या उद्योगात जम बसवण्याच्या प्रयात्नात आहे. लांबूनच वहिनींना एक ओळखीचा चेहरा दिसला. तो एक डॉक्टर होता आणि आता तो मोर्च्यातल्या लोकांना पाणी देत होता.

मोर्च्या पुढे सरकत राहिला आणि वाहिनी भूतकाळात जाऊ लागल्या. तीन वर्षांपूर्वीच हे डॉक्टरचे स्थळ वहिनींना सांगून आले होते. पंधरा लाख रुपये हुंडा आणि लग्न करून द्या म्हणाले. वहिनींच्या वडिलांची तेवढी ऐपत नव्हती. तेव्हा भाऊ म्हणाला होता कि मला जर तेवढेच मोठे स्थळ आले तर आपण ह्यांना हो म्हणू. पुढे काहीच झाले नाही. मग काही महिन्यांनी हे स्थळ सांगून आले. खानदान तोलामोलाच होत, मुलगा चांगला शिकलेला होता, काही एकर जमीन होती, स्वतःचा व्यवसाय होता, दोन बहिणींचे लग्न झाले होते आणखी काय हवे. आता लग्नाला वर्ष झाले होते आणि वहिनींना सर्व कळून चुकले होते. नवऱ्याने एका नातेवाईकाच्या कॉलेज मध्ये आर्टस् आणि एमबीए डिग्री मिळवली होती. एमबीए डिग्री असून हि नवरा एक ई-मेल लिहू शकत नव्हता. जमिनीवर पन्नास लाखाचं कर्ज काढून नवीन धंदा पार्टनरशिप मध्ये टाकला आहे. उधारीचे वसुली झाली नाही म्हणून गेल्याच महिन्यात घरातले दागिने गहाण ठेऊन देणी भागवली होती. डीलर च्या ग्रुप ने दोन लाख भरून साऊथ आफ्रिकेची ट्रिप ठरवली आणि हे दोन पार्टनर ट्रिपला गेले होते.
फोनची रिंग वाजली आणि वाहिनी भानावर आल्या. फोन घेतला आणि पलीकडून आवाज आला "दोन तास झाले, अजून मोर्च्याच्या फोटो नाही आला whatsapp वर, काय कुठे हॉटेलात बसला का काय? "

- चं दे